मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. विशेष सरकारी वकील आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन विरोधी पक्षामधील नेत्यांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्यात येत असल्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.
एवढेचं नव्हे तर 125 तासांचे स्टिंग ऑपरेशन पेन ड्राईव्ह (sting operation pen drive) देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाचाही उल्लेख अप्रत्यक्षरित्या फडणवीसांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांनंतर आता शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांचा काही भाग समजला नाही. सरकारी अधिकाऱ्यांचे125 तासांचे रेकॉर्डिंग होतं हे कौतुकास्पद आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर केल्याशिवाय हे शक्य नाहीय. आरोपांबाबत मी खोलात गेलो नाही. आरोपांची राज्य सरकारकडून चौकशी व्हावी. माझे अप्रत्यक्षपणे यातं नाव घेतले गेले. पण माझा काहीचं संबंध नाही. रेकॉर्डिंगच्या सत्यतेबाबत पडताळणी करणे गरजेचं आहे.असं शरद पवार म्हणाले आहेत.
सरकार गेल्यामुळे भाजप सध्या अस्वस्थ आहे. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी कशी केली जाते याचे अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण आहे. सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न आहे. पण सरकारला कोणीही धक्का लावू शकत नाही. सरकार 5 वर्षे टिकेल असंही शरद पवार म्हणाले.