देशातील राजकीय स्थैर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच – शरद पवार

WhatsApp Group

मुंबई – आज जेव्हा आपण आपल्या देशाच्या शेजाऱ्यांकडे बघतो त्यावेळी राजकीय स्थैर्य आणि लोकशाहीची किंमत लक्षात येते. भारताचे राजकीय स्थैर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी काढले.

राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे आदी यावेळी उपस्थित होते.

खासदार शरद पवार म्हणाले, भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे अनेक धर्म, जाती आणि विविधता आहे तिथे राजकीय स्थैर्य निर्माण करण्याचे श्रेय बाबासाहेबांना जाते. भारतीय राज्यघटनेची निर्मिती हे महान कार्य तर बाबासाहेबांनी केलेच पण त्याशिवाय ते एक अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला जी दिशा दाखविली त्यातूनच स्वतंत्र भारताच्या प्रगतीला गती मिळाली.

आज जेव्हा आपण वीजटंचाईचा प्रश्न पाहतो त्यावेळी बाबासाहेबांनी स्वतंत्र भारतात वीजनिर्मितीला अधिक महत्त्व दिले पाहिजे यासाठी जी आग्रही भूमिका मांडली, तिचे महत्त्व अधिक समजून येते. जलविद्युत निर्मिती आणि सेंट्रल पॉवर ग्रीड यासाठी त्यांनी केलेले कार्य निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. देशात उद्योग व्यवसाय वाढले पाहिजेत आणि त्यासोबतच कामगारांच्या हक्कांवर गदा येता कामा नये अशी भूमिका त्यांनी मांडली.

आज जेव्हा देशभर आपण फिरतो त्यावेळी बाबासाहेबांचे विचार किती खोलवर पोहोचले आहेत याची जाणीव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांनी समाजात समता, बंधुता आणि न्याय ही तत्वे रूजविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असं शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.