शिंदे गटातील अनेक आमदार पुन्हा येतील, काही जण संपर्कात आहेत; संजय राऊत

WhatsApp Group

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यास त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी केले आहे. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असून त्यातील काही काहींना भावनिक करून शिवसेनेतून फोडण्यात आले असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरही टीका केली आहे.

संजय राऊत यांनी दिल्लीतील निवसास्थानी पत्रकारांशी संवाद साधला. संविधानाची सीमा ओलांडून सुप्रीम कोर्ट निर्णय देणार नाही असा विश्वास वाटतो. त्यामुळे 16 आमदार अपात्र ठरतील अथवा फुटीर गटाला इतर पक्षात सामिल व्हावे लागेल असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं. दुसऱ्या पक्षात विलीन होण्याबाबत अनेक आमदारांची तयारी नाही. त्यामुळे त्यातील अनेकजण पुन्हा येतील. काही जण संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

राज्याचे मुख्यमंत्री वारंवार दिल्लीत जात आहे. एकाच महिन्यात पाच वेळेस मुख्यमंत्र्यांना दिल्लीत यावं लागतं, त्यामुळे ते त्यांचा मुक्काम दिल्लीत हलवणार आहेत का, असा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात निर्माण झाला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. राज्यात पूर स्थिती गंभीर आहे. दोन लोकांचे कॅबिनेट निर्णय घेत आहे. यातून राज्याला आणि त्यांच्या गटाला काय मिळतंय हा संशोधनाचा मुद्दा असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.