भीषण रस्ता अपघात; दोन बसच्या धडकेत 40 जणांचा मृत्यू, 85 जण जखमी

WhatsApp Group

सेनेगलमधील कॅफ्रीन शहराजवळ रविवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. येथे दोन बसच्या धडकेत 40 जणांचा मृत्यू तर 85 जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर अध्यक्ष मॅकी सॅल यांनी सोमवारपासून पुढील तीन दिवस राष्ट्रीय शोक जाहीर केला. राष्ट्रपती भवनाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्य सेनेगलमधील कॅफ्रीन शहराजवळ दोन बसची टक्कर झाली. दोन्ही बसमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे 40 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 85 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

अपघात कधी झाला?

स्थानिक वेळेनुसार रविवारी पहाटे 3.15 वाजता ही घटना घडली. रस्ता अपघातानंतर सर्व प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आणि जखमींना कॅफ्रीन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात झालेल्या बसेस हटवण्यात आल्या असून रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. शेख फॉल म्हणाले की, राज्यपाल आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आधीच भेट दिली आहे. अध्यक्ष मॅकी सॅल म्हणाले की राष्ट्रीय शोक कालावधी संपल्यानंतर, “रस्ता सुरक्षेवर कठोर उपाययोजना करण्यासाठी” एक सरकारी परिषद आयोजित केली जाईल.

सोशल मीडियावरील अपघाताच्या फोटोंमध्ये अपघातग्रस्त बस एकमेकांवर आदळल्या आणि रस्त्याच्या कडेला ढिगारा पडलेला दिसत आहे. यापूर्वी 2017 मध्ये दोन बसच्या अपघात झाला होता त्यावेळी 25 जणांचा मृत्यू झाला होता.