
मुंबई : राज्यात शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष संपण्याचे नाव घेत नाहीये. आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. मुंबईतील प्रभादेवी परिसरात दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. शिंदे गटाचे आमदार सदासरवणकर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला आहे. असेच अनेक आरोप दुसऱ्या बाजूनेही केले जात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
कार्यकर्ता पोलीस कोठडीत
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर ठाकरे गटाबद्दल आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्यानंतर या दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. गणेश विसर्जनाच्या वेळीही दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. ही घटना काल रात्री उशिरा घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली असून, ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबईतील प्रभादेवी परिसरात शिंदे समर्थक आणि ठाकरे गटात झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटाचे महेश तेलवणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र शिंदे गटातील लोकांवर पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोप ठाकरे गोटातून केला जात आहे.