पश्चिम बंगाल सरकारने सौरव गांगुलीला दिली ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा!

0
WhatsApp Group

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली सध्या IPL 2023 आयपीएलमध्ये व्यस्त असून तो सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदी काम करत आहे. दिल्ली कॅपिटल्स IPL स्पर्धेतून बाहेर पडली असली तरी सध्या सौरव गांगुलीशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगाल सरकारने सौरव गांगुलीची सुरक्षा Y श्रेणीवरून Z श्रेणीत वाढवली आहे.

एएनआयच्या रिपोर्टनुसार, सौरव गांगुलीने त्याच्या सुरक्षेबाबत कोणतीही मागणी केलेली नाही. मात्र सौरव गांगुलीची Y श्रेणीची सुरक्षा संपल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. झेड श्रेणीनुसार आता सौरव गांगुलीच्या सुरक्षेत 8 ते 10 पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. यापूर्वी दादांच्या सुरक्षेत तीन पोलीस तैनात होते.

या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “व्हीव्हीआयपींची सुरक्षा संपल्यानंतर प्रोटोकॉलनुसार आढावा घेण्यात आला आणि गांगुलीची सुरक्षा झेड श्रेणीत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली कॅपिटल्स संघ 21 मे ला ते कोलकाता येथे येणार असून तेव्हापासून सौरव गांगुली झेड श्रेणीची सुरक्षा मिळण्यास सुरुवात होणार आहे.

सौरव गांगुलीची 2019 मध्ये बीसीसीआयचे अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र काही काळानंतर म्हणजे 2022 मध्ये त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गांगुली राजकारणात येणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली होती. मात्र, वेळोवेळी सौरव गांगुलीने या वृत्तांचे खंडन केले.

मात्र पश्चिम बंगाल सरकारकडून सौरव गांगुलीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याने तो राजकीय क्षेत्रात दाखल होण्याच्या वृत्ताने जोर पकडला आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल सीव्ही आनंदा बोस, तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रीय सचिव अभिषेक शर्मा आणि मंत्री फिरहाद हकीम आणि मोलॉय घटक यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

– समीर आमुणेकर