Jammu Kashmir : जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, 5 दहशतवादी ठार

WhatsApp Group

कुपवाडा : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हे सर्व दहशतवादी पाकिस्तानचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी आज सकाळी हे ऑपरेशन सुरू केले, ज्यामध्ये हे सर्व दहशतवादी मारले गेले आहेत. आता संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

याआधी सुरक्षा दलांनी बहराबाद हाजीनमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली होती. सुरक्षा दलांनी त्याच्याकडून दोन चिनी हातबॉम्बही जप्त केले आहेत. बांदीपोरा पोलीस, 13 RR आणि CRPF 45BN बटालियन यांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दहशतवाद्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायदा आणि UA (P) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी 1 जून रोजी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात दोन लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवाद्यांना अटक केली होती आणि त्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रेस्टीहार वारिपोरा गावात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी फ्रेस्टीहार वारिपोरा चौकात मोबाईल व्हेईकल चेकपॉईंट (MVCP) उभारले होते. यादरम्यान क्रॉसिंगवरून येणाऱ्या दोन संशयितांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पकडले गेले.