
मुंबई : मुंबई शहरात शुक्रवारी रात्री उशिरा 26/11 सारख्या हल्ल्याचा इशारा देणारे धमकीचे संदेश आल्यानंतर मुंबई पोलीस आता सतर्क झाले आहेत. खबरदारी म्हणून, मुंबई पोलिसांनी शनिवारी शहर, समुद्रकिनारा आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली, गेटवे ऑफ इंडिया आणि इतर काही पर्यटन स्थळे बंद केली.
गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद
गुरुवारी रायगड किना-यावर शस्त्रांसह एक संशयास्पद बोट सापडल्यानंतर मुंबई पोलीस आधीच सतर्क झाले आहेत. गेटवे ऑफ इंडिया देखील शनिवारी संध्याकाळी 7 नंतर अभ्यागतांसाठी बंद करण्यात आला, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण शहरात पोलिस तैनात करण्यात आले. त्याचवेळी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “बोट मिळाल्यानंतर आम्ही गेटवे ऑफ इंडियासह सर्व पर्यटन स्थळांवर सुरक्षा वाढवली आहे. तर 26/11 च्या धमकीनंतर गेटवे ऑफ इंडिया आणि इतर पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँच टीम आणि दहशतवाद विरोधी पथकासह सर्व पोलिस दलांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. बॉम्ब शोधक व निकामी पथक, श्वानपथक आणि राज्य राखीव पोलीस दल यांसारख्या अतिरिक्त दलांनाही सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, “सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहेत आणि सार्वजनिक ठिकाणच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.