नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगावर बर्फ जमा होणे हे षडयंत्र असल्याचा अंनिसने केलेला दावा खरा ठरला आहे.बाहेरून बर्फ आणून पिंडींवर ठेवणाऱ्या व भाविकांच्या श्रद्धांशी खेळणाऱ्या पुजार्यां विरोधात गुन्हा नोंदवला गेला असला तरी, जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावावेत, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक, त्र्यंबकेश्वर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगावर बर्फाच्या थर जमा झाला. हा काहीतरी दैवी संकेत आहे, दैवी चमत्कार आहे, असा दावा करणारा व्हिडिओ प्रसार माध्यमातून दि.३० जून,२०२२ रोजी प्रसारित होत असल्याचे दिसले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील कार्यकर्त्यांनी तातडीने या घटनेची गंभीर दखल घेऊन, घटनास्थळावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा ही घटना मानवी हस्तक्षेपा शिवाय घडणे शक्य नाही, असे लक्षात आले.
म्हणून त्या दिवसाच्या, त्यावेळेचे सीसी टीव्ही फुटेज तपासले जावेत आणि दोषींवर जादूटोणाविरोधी कायद्या अंतर्गत कडक कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त तसेच पोलीस निरीक्षक त्रंबकेश्वर पोलीस ठाणे यांना देण्यात आले होते.
मंदिरातील शिवलिंगावर बर्फ जमा होणे, ही घटना मानवी हस्तक्षेपा शिवाय शक्य नाही, हा महाराष्ट्र अंनिसचा अंदाज खरा ठरला आहे . कारण काल त्र्यंबकेश्वर मंदिरातील एक पुजारी आणि त्यांचे दोन सहकारी यांच्यावर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजते.
दोषींवर ह्या गुन्ह्यात इतर कलम लावलेले आहेत. मात्र जादूटोणाविरुद्ध कायद्याचे कलम लावलेले नाही. म्हणून इतर कलमांसोबतच दोषींवर जादूटोणाविरोधी कायद्याचेही कलम लावावे आणि प्रत्यक्ष सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे असतानाही हा गुन्हा दाखल होण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी का लागला, याची सखोल चौकशी करून, संबंधित दोषींवरही कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे,राज्य कार्यवाह,कृष्णा चांदगुडे व त्र्यंबकेश्वर शहर कार्याध्यक्ष,संजय हरळे यांनी केली आहे.
