धुळे – साक्री तालुक्यामधील मसदी येथील गंगामाई कन्या विद्यालयमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाराधम शिक्षक असलेल्या कौतिक साहेबराव चव्हाण यांनी एका विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
आणि नंतर याच शिक्षकाने काही पैसे देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये समोर आली.यावेळी विजय अहिरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले की, गंगामाई कन्या विद्यालय या संस्थेमध्ये डिसेंबर २०२० मध्ये वाद झाले होते.
त्यानंतर मुख्याध्यापिका वर्षा नरेंद्र देवरे यांनी मला या वादाचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सांगितले होते. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना शिक्षक कौतिक साहेबराव चव्हाण हा दहावीच्या एका विद्यार्थ्यांनीसोबत अश्लील चाळे करताना दिसून आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं.
यानंतर तो व्हिडिओ पेन ड्राइवमध्ये काढून उपशिक्षक असलेले नरेंद्र आत्माराम देवरे यांच्याकडे दिला. परंतु, त्यांनी त्या शिक्षक असलेल्या कौतिक साहेबराव चव्हाण यांच्यावर कारवाई न करता उलट माझ्यावरच कारवाईची धमकी दिली. तू हे प्रकरण बाहेर आणू नको नाहीतर तुला नोकरीवरून काढून टाकू अशी धमकी दिली त्यानंतर मुख्याध्यापिका वर्षा देवरे व उपशिक्षक असलेले नरेंद्र देवरे यांनी त्या शिक्षकाकडून तीन लाख रुपये घेतले आणि हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, अशी धक्कादायक माहिती पत्रकार परिषदमध्ये बोलतांना सांगितली.
या प्रकरणात आता संशयित असलेल्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार देऊन त्यांची ई-कॅमेरा चौकशी करा, तसेच तिघांवर कठोर कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा अशी मागणी कनिष्ठ लिपिक विजय आरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.