शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची कास महोत्सव व कास पठारास भेट

WhatsApp Group

सातारा :  शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कास महोत्सव 2022 व कास पठारास सदिच्छा भेट दिली. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व उपवनसंरक्षक महादेव मोहिते उपस्थित होते.

यावेळी दीपक केसरकर म्हणाले, कास पठार हे जागतिक वारसास्थळ आहे, जैवविविधतचे भांडार असून महाराष्ट्राचे तसेच  पश्चिम घाटाचे वैभव आहे. येथील निसर्गाचे संवर्धन करताना स्थानिक ग्रामस्थांच्या रोजगारासाठी पर्यटन व वन पर्यटनासारखे पर्याय उपलब्‌ध करुन देणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करत पर्यटनाला चालना देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येईल. सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटन विकासाला खूप वाव आहे. यासाठी येथील पर्यटन विकास आराखडा तयार करावा तसेच शिवसृष्टीसारखा प्रकल्पही शासनामार्फत साकारण्यात येईल. साताऱ्याचा पर्यटन विकास करण्यासाठी कटिबध्द असून शालेय मुलांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती होण्यासाठी शालेय स्तरांवर ग्रीन आर्मी सारखे उपक्रम राबविण्यात येतील असेही दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले,  कास महोत्सवाला पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. येथे स्थानिकांनी उभारलेल्या स्टॉललाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथे पर्यटन वाढीसाठी खूप वाव आहे. या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याबरोबरच पर्यावरणपूरक पर्यटन कसे वाढविता येईल यासाठी प्रयत्न केले जातील.

राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग आणि पर्यटन विभाग यांचे कास महोत्सव 2022 आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांचा सत्कार केला.