सत्संगात चेंगराचेंगरी, 126 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 25 महिलांचा समावेश

WhatsApp Group

Hathras Ratibhanpur Satsang Stampede: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मंगळवारी रतीभानपूर गावात सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली. एटा सीएमओ उमेश त्रिपाठी यांनी अपघातात 126 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. एडीजी आग्रा आणि अलिगढचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक तपास पथक तयार करण्यात आले आहे. ठार झालेल्यांमध्ये 25 महिला असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस दल आणि प्रशासनाचे अधिकारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. जखमी महिला, मुले आणि पुरुषांना बेशुद्ध अवस्थेत एटा, अलीगड, सिकंदरराव रुग्णालयात नेण्यात आले आहे.

पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी उशिरा पोहोचली. लखनऊमधील कोणत्याही प्रमुख जबाबदार अधिकाऱ्याने अद्याप कोणतीही अपडेट दिलेली नसली तरी सीएमओने सांगितले आहे की 126 लोकांचे मृतदेह रुग्णालयात पोहोचले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. संपूर्ण गावाचे छावणीत रूपांतर झाले आहे.

दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्री लक्ष्मी नारायण, मंत्री संदीप सिंह, मुख्य सचिव आणि डीजीपी यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले असून तपासाचे आदेश दिले आहेत. एडीजी आग्रा आणि अलिगड आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक तपास पथक तयार करण्यात आले आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी मृतांना 2-2 लाख रुपये आणि जखमींना 50-50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, कार्यक्रम आयोजकांवर एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.