२ दिवसांपूर्वी झालं लग्न, पुण्याहून जेजुरीला देवदर्शनासाठी आलेल्या नवदाम्पत्याचा रिक्षा विहिरीत पडून मृत्यू

0
WhatsApp Group

पुण्यातील सासवडनजिक बोरगावकेमळा येथे रस्त्याच्याकडेला एक विचित्र अपघात घडला. पुण्यातील धायरीहून जेजुरी येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची रिक्षा विहिरीत पडली. या अपघातात नवदाम्पत्यासह एका तरुणीचा मृत्यू दुर्देवी मृत्यू झाला. तर दोन गंभीर जखमींना वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे. रिक्षाचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडत संसाराला सुरुवात होण्याअगोदरच नवविवाहितांचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या अपघातात तीन  जणांचा मृत्यू झाला आहे.मृतात दोन महिला व एक पुरुषांचा समावेश आहे.

सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रिक्षा विहिरीत पडून हा गंभीर अपघात झाल्यानंतर या नवदाम्पत्याचा आणि रिक्षातील असलेल्या इतर व्यक्तींचा त्यांच्या कुटुंबियांशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे कुटुंबिय चिंतेत होते. दरम्यान, आज सकाळी व्यायामाला जाणाऱ्या मुलांना विहिरीतून मदतीसाठी हाक ऐकू आल्याने त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता अपघात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. विहिरीत मदतीसाठी ओरडणाऱ्या दोन व्यक्तींची माहिती सासवड पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना सुखरुप बाहेर काढलं आहे.