Sarfaraz Khan: रणजीमध्ये सरफराज खानची बॅट पुन्हा गरजली, ठोकलं शानदार शतक

WhatsApp Group

Sarfaraz Khan Century: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सरफराज खानला स्थान मिळू शकले नाही. सरफराजला संघात संधी न मिळाल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण हा फलंदाज आपल्या बॅटने वादळ निर्माण करतोय. मुंबईचा फलंदाज सर्फराज खानने रणजी ट्रॉफी सामन्यात दिल्लीविरुद्ध खेळताना आणखी एक शतक झळकावले आहे. सरफराजचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 13 वे शतक आहे.

110 धावांवर पाच गडी गमावल्यानंतर मुंबईचा संघ संघर्ष करत होता, मात्र सरफराज खानने आघाडी घेत शम्स मुलाणीसोबत शतकी भागीदारी करत संघाला सावरले. सरफराज खानने 135 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सरफराज खानने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 2 षटकार मारले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत निवड झालेल्या पृथ्वी शॉने 40 धावांची खेळी खेळली, तर कर्णधार अजिंक्य रहाणेला केवळ दोन धावा करता आल्या. मुशीर खानने 14, अरमान जाफरने 2 धावा आणि प्रसाद पवारने 25 धावांचे योगदान दिले.

सरफराज खानने गेल्या 25 डावांमध्ये एक त्रिशतक, 2 द्विशतकं आणि 7 शतकं झळकावली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 80 च्या पुढे गेली आहे. त्याने आतापर्यंत 36 सामन्यांच्या 52 डावांमध्ये 3380 धावा केल्या आहेत. 25 वर्षीय सरफराजला निवड समितीने दुर्लक्ष केल्याने तो निराश झाला आहे. त्याला अद्याप टीम इंडियात स्थान मिळवण्याची संधी मिळालेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याचे स्थान निश्चित मानले जात होते, मात्र जेव्हा त्याचे नाव टीम इंडियामध्ये आले नाही तेव्हा क्रिकेटप्रेमींना धक्काच बसला. रनमशिन बनत चाललेला सरफराज लवकरच टीम इंडियात स्थान मिळवेल अशी अपेक्षा आहे.