पाहा, आई-वडिलांनी मला मतदान न केल्यास दोन दिवस जेवू नका, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना सल्ला
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तुमचे आई-वडील जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा, असं अजब सल्ला त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना दिला. आमदार बांगर हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात असलेल्या लाख गावातील विकासकांचे उद्घाटन व शाळेमध्ये विकास कामाच्या भूमिपूजन निमित्ताने कार्यक्रमाला गेलेले होते. यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला. Santosh Bangar video
“आई-पप्पा म्हणत असतील आपल्याला मतदान दुसरीकडे करायचं, तर दोन दिवस जेवायचं नाही. आई-पप्पांनी विचारलं की का जेवायचं नाही? तर त्यांना सांगायचं आमदार संतोष बांगरला मतदान करा, तेव्हाच जेवू नाहीतर जेवणार नाही”, असे ते विद्यार्थ्यांना म्हणाले. त्यानंतर, सांगा कोणाला मतदान करायचे? असे विचारत त्यांनी विद्यार्थ्यांना जोरात उत्तर द्या असे सांगितले. त्यावर सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्याने संतोष बांगर असे उत्तर दिले. हा सर्व संवाद व्हिडिओमध्ये कैद झाला असून त्याची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
कोवळ्या कोवळ्या निष्पाप मुलांना तुमचे आईबाप संतोष बांगर ला मतदान देत नाहीत त्यासाठी दोन दिवस उपाशी रहायला सांगतायत🥶@ECISVEEP @SpokespersonECI आतातरी तुम्ही कारवाई करणार कि नाही….???? @maha_governor काय चाललंय हे महाराष्ट्र मध्ये🤔 pic.twitter.com/MuZ9awXyMA
— Amit Talks😉 (@AmitTalkss) February 10, 2024
संतोष बांगर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावर टीकाही होते. आता पुन्हा त्यांचा हा व्हिडिओ चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच, 2024 मध्ये मोदी पंतप्रधान नाही झाले तर मी भरचौकात फाशी घेईन, अशी गर्जनाही त्यांनी केली होती. त्यापूर्वी कळमनुरी बाजार समितीमध्ये सत्ता न आल्यास मिशी कापेल, असे चॅलेंजच बांगर यांनी दिले होते. पण, निवडणुकीनंतर येथे महाविकास आघाडीची सत्ता आली आणि बांगर यांची फजिती झाली होती. याशिवाय, काहीही झाले तरी मी शिंदे गटात जाणार नाही. मी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहीन. मी गद्दार नाहीय असे सांगताना ते मध्यंतरी ढसाढसा रडले होते. त्यानंतर पुढच्या काही दिवसांतच ते शिंदेगटात गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. Santosh Bangar video shivsena