पंढरपूर – कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर 2022 या यंदाच्या वर्षी पंढरपूरची आषाढी वारी पुन्हा एकदा होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे विविध प्रकारची बंधने या सोहळ्यावर आली होती. कधी एसटीने तर कधी वेगळ्या पद्धतीने संतांच्या पालख्या पंढरपुरामध्ये दाखल झाल्या होत्या.
मात्र आता कोरोनाची सर्व बंधने सरकारकडून रद्द करण्यात आल्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैष्णवभाई एकत्र होतील. आषाढी एकादशीचा सोहळा सर्व वारकऱ्यांना चालत पंढरपूरला जाऊन आता अनुभवता येणार आहे. या यंदाच्या वारीच्या सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान 21 जून रोजी होईल. यंदा पालखी सोहळ्यामध्ये तिथीची वृद्धी झाली आहे. त्यामुळे लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी मुक्कामी असेल. दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्याने वाहनपास देण्यात येईल, अशी माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.