Sanju Samsonच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद, झिम्बाब्वेमध्ये असे करणारा ठरला पहिला भारतीय यष्टीरक्षक

WhatsApp Group

India vs zimbabwe 2nd ODI: एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर 5 विकेट्सने मात केली. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे. आता मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने चांगली कामगिरी केली. यासाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. दरम्यान सॅमसनने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.

झिम्बाब्वेमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारा संजू हा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाला ही कामगिरी करता आली नाही. संजूने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 39 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या. त्याच्या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. सॅमसनने या सामन्यात 110.26 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 38.1 षटकांत सर्वबाद 161 धावा केल्या. यादरम्यान भारताकडून शार्दुल ठाकूरने चांगली गोलंदाजी केली. त्याने 7 षटकात 38 धावा देत 3 बळी घेतले. मोहम्मद सिराजने 8 षटकात 16 धावा देत एक विकेट घेतली. सिराजनेही मेडन ओव्हर काढले. प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि दीपक हुडा यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.

झिम्बाब्वेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 25.4 षटकांतच लक्ष्य गाठले. सॅमसनसोबत शिखर धवननेही टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली. त्याने 21 चेंडूत 33 धावा केल्या. धवनच्या खेळीत 4 चौकारांचा समावेश होता. शुभमन गिलने 34 षटकात 33 धावा दिल्या तर दीपक हुडाने 25 धावांचे योगदान दिले.