संजू सॅमसनचा धमाका! रोहित-कोहलीच्या ‘स्पेशल क्लब’मध्ये मिळवलं स्थान, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला चौथा भारतीय

WhatsApp Group

आयपीएल २०२६ मधील १८ व्या सामन्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर धावांचा पाऊस पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील या लढतीत सीएसकेचा स्टार फलंदाज संजू सॅमसनने आपल्या बॅटने नवा इतिहास रचला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात संजूने केवळ ५६ चेंडूंमध्ये नाबाद ११५ धावांची झंझावाती खेळी केली. या शतकी खेळीत त्याने १५ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी करत संघाची धावसंख्या २१२ पर्यंत पोहोचवली. या कामगिरीसह संजूने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या एका विशेष ‘एलिट क्लब’मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.

टी२० क्रिकेटमध्ये ४०० षटकारांचा टप्पा पार

संजू सॅमसन आता टी२० क्रिकेटमध्ये ४०० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम केवळ रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या तिघांनाच जमला होता. रोहित शर्मा ५५४ षटकारांसह या यादीत अव्वल स्थानी आहे, तर सूर्यकुमार यादव ४४२ आणि विराट कोहली ४४१ षटकारांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. संजू सॅमसनने आता ४०१ षटकारांचा टप्पा ओलांडून या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.

विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

केवळ षटकारांचा विक्रमच नाही, तर संजूने विराट कोहलीच्या आणखी एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. संघाने २०० हून अधिक धावा केल्या असताना वैयक्तिक शतक झळकावण्याच्या बाबतीत संजू आता कोहलीसोबत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. संजूचे हे आयपीएलमधील चौथे शतक असून, त्यापैकी तीन वेळा त्याने हे शतक तेव्हा झळकावले आहे जेव्हा त्याच्या संघाने २०० हून अधिक धावसंख्या उभारली. या यादीत ख्रिस गेल आणि जोस बटलर ४ शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहेत.

चेपॉकवर ‘सॅमसन’ शो: दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई

टॉस गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी संजू सॅमसन आज तारणहार ठरला. सुरुवातीपासूनच त्याने आक्रमक पवित्रा घेत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना मैदानावर चोहोबाजूंनी पळवले. संजूच्या या शतकी धमाक्यामुळे चेन्नईने २० ओव्हरमध्ये २ गडी गमावून २१२ धावांचा डोंगर उभा केला. संजूची ही नाबाद ११५ धावांची खेळी या हंगामातील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जात आहे, ज्याने पुन्हा एकदा त्याच्याकडे असलेल्या अफाट टॅलेंटची साक्ष दिली आहे.