बचतगटाच्या मदतीतून रचला संगिता कोळींनी ‘सरस’ पाया

WhatsApp Group

महिला ही कुटुंबाची केंद्रबिंदू असून तिच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि आत्मविश्वासावर संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. यामुळेच महिलांचे सक्षमीकरण हे प्रगत समाजाचे लक्षण मानले जाते. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना व स्वयंसेवी संस्था प्रयत्नरत आहेत. मात्र, अशा संधीचा उपयोग करून स्वतःची वेगळी वाट निर्माण करणाऱ्या महिलाच खरी समाजपरिवर्तनाची गाथा लिहितात. वाळवा तालुक्यातील कारंदवाडीच्या संगिता रामचंद्र कोळी यांनी ही प्रेरणा सर्वांसमोर ठेवली आहे.

संगिता कोळी यांचा स्वीट कोकम, काजू, बेदाणा व सुका मेवासाठीचा “सरस” हा ब्रँड आता राज्य-परराज्यात सरस ठरला आहे. 1200 रूपयांच्या कर्जापासून सुरू झालेला हा प्रवास आज वार्षिक 25 लाख रूपयांच्या उलाढालीवर येऊन स्थिरावला आहे. गेल्या 35 वर्षांतील संघर्ष, जिद्द, चिकाटी व परिश्रम यांच्या पायावर संगिताताईंनी ही भरारी घेतली आहे.

याबाबत संगिता कोळी म्हणाल्या, माहेरची परिस्थिती बेताची असल्याने दहावी झाल्यावर 1990 मध्ये लगेच माझे लग्न करण्यात आले. माझे पती पदवीधर होते. मात्र नोकरी नसल्याने ते व सासू, सासरे शेतीमध्ये रोजंदारीवर जायचे. त्यांच्यासोबत मीही रोजंदारीवर जावू लागले. रोजंदारी करत करत आठवडी बाजारात भाजी विकण्याचेही काम मी 1995 पर्यंत केले. दरम्यान माझ्या दोन मुलांचा जन्म झाला. त्यानंतर मला स्वतःचा व्यवसाय करावा, असे वाटायचे. माझ्या मामांनी मला प्रोत्साहन दिले व बेदाणा विक्रीचा सल्ला दिला, असे त्यांनी सांगितले.

1995 च्या दरम्यान तासगाव येथून बेदाणा खरेदी करून त्या सांगलीतील गणपती पेठेत विकत असत आणि पुन्हा सायंकाळी कारंदवाडीला परतत असत. हे करताना तीन वर्षांचा एक आणि तीन आठवड्यांचा एक अशी स्वतःची दोन चिमुकली मुले सोबत घेऊन त्यांनी हा प्रवास केला. दोनच वर्षांत त्या या बेदाणा विक्रीच्या व्यवसायात तरबेज झाल्या. त्यानंतर मामांच्या पावलावर पाऊल ठेवत जागतिक पर्यटन केंद्र असलेल्या महाबळेश्वर येथे रस्त्यावर बसून बेदाणा विक्री करण्यास त्यांनी सुरवात केली.

नवसहस्त्रक उजाडताना संगिता कोळी यांना व्यवसायवाढीचे वेध लागले. 2003 च्या आसपास त्या तत्कालिन वीराचार्य व नामकरणानंतर आताच्या ज्ञानदा महिला स्वयंसहायता बचत गटाच्या सदस्या झाल्या. बचत गटाच्या माध्यमातून त्यावेळी त्यांना बाराशे रूपयांचे कर्ज मिळाले. त्यातून त्यांनी काजू प्रक्रियेचे यंत्र खरेदी केले. त्यासाठी काजू प्रक्रियेचे रीतसर प्रशिक्षणही घेतले आणि सांगली जिल्ह्यातील पहिला नोंदणीकृत काजू प्रक्रिया प्रकल्प सरस या नावाने त्यांनी सुरू केला. इथेच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आणि त्यांनी पुन्हा मागे वळून बघितले नाही.

संगिता कोळी म्हणाल्या, बचत गटाच्या मदतीनंतर हुतात्मा सहकारी बँक, आष्टाच्या मदतीने मला बीजभांडवल म्हणून 45 हजार रूपयांचे कर्ज मिळाले. त्यातून मी बेदाणे, काजूबरोबर सुका मेवाही विकू लागले. साधारण 15 वर्षांपूर्वी एका प्रयोगातून मला आमच्या स्वीट कोकमचे उत्पादन गवसले आणि हीच आमची आज स्पेशालिटी आहे. बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यात आमचे सरस स्वीट कोकम विक्रीसाठी उपलब्ध आहे. पूर्ण देशभरात स्वीट कोकम हे आमचेच प्रॉडक्ट आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

प्रसंगी घाटातून पिकअप शेड चालवले. वाहनातून 50 किलोची पोती घरी उतरवली. कारंदवाडी, तासगाव, सांगली ते पुन्हा कारंदवाडी असा दर दिवशी प्रवास केला, हे जुने प्रसंग सांगताना संगिताताई आजही गहिवरतात.  विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिला असूनही कच्चा माल खरेदीसाठी त्या एकटीने विमानप्रवास करतात.

बाजारपेठ ओळखून महाबळेश्वर हे विक्रीचे ठिकाण म्हणून निवडले. सातत्याने मेहनत, दर्जेदार मालाची जपणूक आणि ग्राहकांशी विश्वासार्ह संबंध याचबरोबर मालाचा दर्जा व दर यांची योग्य सांगड घातल्यामुळे विक्रीत वाढ झाल्याचे गमक असल्याचे संगिता कोळी सांगतात.

बचत गटाच्या 1200 रूपये कर्जापासून सुरू झालेला प्रवास आज वार्षिक 25 लाखाच्या उलाढालीपर्यंत येऊन पोहोचला आहे. कारंदवाडी येथील युनिटमध्ये उत्पादन निर्मिती आणि महाबळेश्वरसह प्रत्येक राज्यात विक्री करण्यात त्यांचा जम बसला आहे. महाबळेश्वर येथे त्यांनी स्वतःचे घरही घेतले आहे. पती, दोन मुलांसह सुना, नातवंडे असे कौटुंबिक पसारा वाढून संगिता कोळी यांचे दहा सदस्य आहेत. मुलं आणि सुनाही आता त्यांच्या कारभारास हातभार लावत आहेत.

संगिता कोळी यांनी आपली प्रगती साधताना आपल्या व्यवसायातून १० ते १५ महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यातून  त्यांनी अनेक कुटुंबांची आर्थिक घडी मजबूत केली आहे. त्यांच्या उपक्रमाला माविम व नाबार्डसारख्या संस्थांचेही पाठबळ लाभले आहे. सांगली, पुणे, मुंबई येथे झालेल्या प्रदर्शनांमध्ये त्यांच्या बचत गटाने सहभाग घेतला. या प्रदर्शनांमुळे त्यांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळालीच, पण इतर महिलांनाही विक्री कौशल्ये, मार्केटिंग व ग्राहकांशी व्यवहार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.

फक्त व्यवसायापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी समाजकार्याची जबाबदारीही जोपासली आहे. ‘महाबळेश्वर ट्रेकर’ या संघटनेतील त्या एकमेव महिला सदस्य असून, त्यांनी महापूर व इतर आपत्तीच्या काळात पोलिस व प्रशासनाला विनामोबदला मदत केली आहे. त्यांच्या या कार्यातून सामाजिक भान, संघटन कौशल्य आणि समाजाशी असलेली नाळ याची प्रचिती येते.

बचत गटाच्या महिलांशी संवाद साधताना संगिता कोळी यांच्या व्यवसायाचा पाया रचला गेला. जीवनाला दिशा मिळाली. आत्मविश्वास वाढला. बचत गट हा फक्त बचतीपुरता नसून, आपले आर्थिक सबलीकरण करून सामाजिक उन्नतीसाठी मदत करू शकतो, हे त्यांनी जाणले. त्यामुळे आजही स्वतंत्र व्यवसाय करताना त्या बचत गटाच्या सक्रिय सदस्या आहेत. एकूणच संगिता कोळी यांच्या कार्याने महिलांना धैर्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची दिशा दिली आहे.