समीर वानखेडेंना न्यायालयाचा मोठा दिलासा, आता २ आठवडे CBI अटक करू शकणार नाही.

0
WhatsApp Group

मुंबई : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या सीबीआयच्या अटकेला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. आता यानंतर सीबीआय दोन आठवडे वानखेडेला अटक करू शकणार नाही. त्याचवेळी न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी २३ जूनची तारीख निश्चित केली आहे. आर्यन खान प्रकरणातील वसुलीप्रकरणी सीबीआय समीर वानखेडेविरुद्ध तपास करत आहे.

मुंबई पोलिस आयुक्तांकडून सुरक्षा मागीतली : यापूर्वी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देऊन सुरक्षेची मागणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला आणि पत्नीला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले. वानखेडे यांनी प्रतिनिधीमार्फत दक्षिण मुंबईतील पोलिस आयुक्तालयाला हे पत्र पाठवले. कॉर्डेलिया क्रूझ ‘अमली पदार्थ’ प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला न अडकवल्याबद्दल सीबीआयने 11 मे रोजी वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध बॉलिवूड अभिनेत्याकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत : वानखेडे यांच्यावर कथित गुन्हेगारी कट, खंडणीची धमकी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत लाचखोरीच्या तरतुदींचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारी सीबीआयने वानखेडे यांची चौकशी केली. भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी वानखेडे यांनी दावा केला आहे की, त्यांना आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांना गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर जिवे मारण्याच्या धमक्या आणि आक्षेपार्ह संदेश मिळत आहेत. ( Sameer Wankhede’s interim protection from arrest extended )