
जळगाव : चोपडा शहरामध्ये प्रेम प्रकरणातून तरुणासह तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी पहाटेच्या सुमारास समोर आल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तरुणाची बंदुकीने गोळी मारून तर तरूणीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे तरुणीच्या 17 वर्षीय अल्पवयीन भावानेच दोघांचा जीव घेतल्यानंतर तो स्वतः पिस्तुलासह पोलीस ठाण्यात हजर राहिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, वर्षा समाधान कोळी आणि राकेश संजय राजपूत अशी मयत प्रेमी युगलाची नावं आहेत. चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारामध्ये पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आलं.
पोलिसांनी दोन अल्पवयीन भावासह दोन संशयितास ताब्यात घेतले आहे. तर आणखी दोघांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मयत तरुणीचा संशयित अल्पवयीन भावानेच दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले हे करीत आहेत.