पंतप्रधानांच्या सुरक्षेची नेमकी जबाबदारी कोणाची? सुरक्षेचा रोजचा खर्च किती?

WhatsApp Group

‘मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा’ असा निरोप विमानतळावर उपस्थित अधिकाऱ्यांना दौरा रद्द करुन दिल्लीला परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi ) दिला. पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय खडाजंगी सुरू आहे.आंदोलक शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यानं पंजाब दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीला परतावं लागलं. पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या या हलगर्जीपणामुळे सध्या सत्ताधारी भाजप आणि पंजाब सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. सुरक्षेतील या तृटीबाबत जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारला दिले आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेची नेमकी जबाबदारी कुणाची, त्यांच्या दौऱ्याची आखणी कशी केली जाते, त्यांच्या सुरक्षेवर किती खर्च केला जातो याबाबत आपण जाणून घेणार आहेत.

SPG (Special Protection Group)कडे पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. पंतप्रधानांच्या अवतीभोवती काळे सूट, गॉगल, कानात इअरफोन, हातात अत्याधुनिक शस्त्र घेऊन हे एसपीजी कमांडो नेहमी वावरत असतात. या एसपीजी कमांडोंना खडतर प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं. एसपीजी सोबतच अडव्हान्स सिक्युरिटी लायझन टीम (ASL), राज्य पोलीस आणि स्थानिक प्रशासनावरही पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा एएसएलच्या मदतीनं पंतप्रधानांच्या दौऱ्यावर लक्ष ठेवून असतात. दौऱ्यापूर्वी एसपीजी पथक कार्यक्रमस्थळी दाखल होतं. स्थानिक पोलीस, प्रशासन यांच्या समन्वयातून नियोजित मार्ग ठरवला जातो.

पंतप्रधानांच्या दौऱ्यात स्थानिक पोलिसांची भूमिका काय?

कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं स्थानिक पोलिसांवर अत्यंत महत्वाची जबाबदारी असते. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सुरक्षित मार्ग ठरवण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. हा मार्ग मोकळा ठेवणं, कार्यक्रमस्थळी सुरक्षा पुरवणं, रस्त्यातील अडसर दूर करण्याची कामं पोलिसांच्या अखत्यारीत येतात. दौऱ्यापूर्वी यासाठीची ‘मॉक ड्रील’ सुद्धा घेतली जाते. राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पंतप्रधानांच्या ताफ्याच्या सुरक्षेचं नेतृत्व करण्याची जबाबदारी असते.एसपीजीच्या ब्लू बुकमधील नियमांचं काटेकोर पालन पंतप्रधानांच्या हवाईदौऱ्यादरम्यान अनिवार्य असतं. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान कार्यक्रमस्थळाला जाण्यासाठी आणखी एक पर्यायी मार्ग तयार ठेवावा लागतो. हवामान बदलाबाबतची वारंवार माहिती घेतली जाते. SPG कडे पंतप्रधानांसह माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी असते. सध्या पंतप्रधानांच्या सुरक्षेवर दररोज १ कोटी ६२ लाखांचा खर्च केला जातो.

इंदिरा गांधींची त्यांच्याच अंगरक्षकांकडून धक्कादायकरीत्या हत्या आल्यानंतरच पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतचे नियम आणखी कडक करण्यात आले. १९८८ साली संसदेत एसपीजी कायदा संमत करण्यात आला. तेव्हापासून आजतागायत एसपीजीकडून पंतप्रधानांना सुरक्षा पुरवली जाते. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी १२ कोटींची मर्सिडिज बेन्झ ही विदेशी कार खरेदी करण्यात आली. या महागड्या गाडीवरुन विरोधकांकडून बरीच टीकाही करण्यात आली होती.
– समीर आमुणेकर