चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार ६०० नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

WhatsApp Group

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असून चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील २ हजार ६०० नागरीकांचे सुरक्षित स्थलांतर केले आहे. लष्कराचे व एनडीआरएफचे प्रत्येकी एक पथक, एसडीआरएफच्या दोन टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.

नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्याची सद्याची पूर परिस्थिती आटोक्यात आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदी धोका पातळीच्यावर वाहत आहे तसेच वर्धा, प्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्यावर वाहत असून नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एक SDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याचे माहिती मिळाली होती. आतापर्यंत ३९७ लोकांना १० निवारा केंद्रात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात जून ते आतापर्यंत ११० महसूल मंडळापैकी ९५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच जिल्ह्यात नागपूरचे SDRF चे एक पथक दाखल झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील चार टीम व तालुका प्रशासन यांनी २ हजार २४७ लोकांना स्थलांतरित करून सुरक्षित स्थळी हलविले आहे.

कोंकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा दिनांक ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ०६ वा. पासून ते सायंकाळी ०७. वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी ०७ वा. ते  सकाळी ०६ वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.