टी-२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असं, दक्षिण आफ्रिकेत फिरकी गोलंदाजांनी केला शानदार पराक्रम
आज जगभरात फ्रँचायझी क्रिकेट खेळले जात आहे. जगातील जवळजवळ सर्व खेळाडू फ्रँचायझी क्रिकेटमध्ये भाग घेतात. सध्या दक्षिण आफ्रिका टी-२० क्रिकेट लीग खेळली जात आहे. २५ जानेवारी रोजी पार्ल रॉयल्स विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यातील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पार्ल रॉयल्सने इतिहास रचला. तसेच असे करणारा तो जगातील पहिला संघ बनला.
पार्ल रॉयल्स असे करणारा पहिला संघ बनला
खरं तर, पार्ल रॉयल्सने प्रिटोरिया कॅपिटल्सविरुद्ध सर्व २० षटके फिरकी गोलंदाजांनी टाकली. फ्रँचायझी क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या संघाने टी-फॉरमॅटमधील सर्व षटके फिरकी गोलंदाजांनी टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या ५ फिरकी गोलंदाजांनी रचला विक्रम
पार्ल रॉयल्सकडून ब्योर्न फोर्टुइन, डुनिथ व्हेलाज, मुजीब उर रहमान, नकाबायोम्झी पीटर आणि जो रूट यांनी गोलंदाजी केली. या सामन्यात फोर्टुइन, मुजीब आणि जो रूट यांनी २-२ विकेट घेतल्या तर वेलेजने १ विकेट घेतली.
पार्ल रॉयल्सने सामना जिंकला
या सामन्यात, पार्ल रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १४०/४ धावा केल्या. रॉयल्सकडून जो रूटने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५६ चेंडूत ७८ धावांची खेळी केली. याशिवाय डेव्हिड मिलर १८ चेंडूत २९ धावा करून नाबाद राहिला. लक्ष्याचा पाठलाग करताना, प्रिटोरिया कॅपिटल्सचा संघ २० षटकांत ७ बाद १२९ धावांवर गारद झाला. विल जॅक्सने ५३ चेंडूत ५६ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. पार्ल रॉयल्सने हा सामना ११ धावांनी जिंकला.