पुतीन यांना ‘मनोरुग्ण’ म्हणणाऱ्या मॉडेलचा निर्घृण खून; आरोपीने केले धक्कादायक खुलासे

WhatsApp Group

रशियन मॉडेल ग्रेटा वेडलर हिच्या मृत्यूने आता खळबळ माजली आहे. ग्रेटाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडला आहे. २३ वर्षीय ग्रेटा गेल्या साधारण वर्षभरापासून बेपत्ता होती, मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय दिसतं होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना तिने ‘मनोरुग्ण’ असे संबोधले होते, तेव्हापासून ती चर्चेत आली होती.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रेटा वेडलरची हत्या तिचा एक्स बॉयफ्रेंड दिमित्री कोरोविनने केली. कोरोविनने ग्रेटाचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून कारच्या ट्रंकमध्ये टाकला. आता कोरोविनने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आणि असंही म्हटलं आहे की, त्याने ग्रेटाला ३०० मैल दूर रशियाच्या लिपेटस्क येथे नेले होते. तिथे त्याने ग्रेटाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवला आणि कारच्या ट्रंकमध्ये असाच सोडून दिला होता.

पैशाच्या वादातून दिमित्री कोरोविननं ग्रेटाची हत्या केल्याचं सांगण्यात येतं आहे. या हत्येचा आणि ग्रेटाच्या राजकीय वक्तव्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगितलं जात आहे. कोरोविनने सांगितले की, तो तीन रात्री हॉटेलच्या खोलीत ग्रेटाच्या मृतदेहासोबत झोपला होता.

ग्रेटाच्या मृत्यूनंतर कोरोविन तिचे सोशल मीडिया पेज अपडेट करत होता, जेणेकरुन कोणालाही तिच्या मृत्यूचा किंवा गायब झाल्याचा संशय येणार नाही. सध्या ग्रेटाचा एक्स बॉयफ्रेंड कोरोविन याने हत्येची कबुली दिली आहे. त्याच्या सांगण्यावरून ग्रेटाचा मृतदेहही सापडला आहे.