
Rule Change from July 1: १ जुलै २०२२ पासून देशात आर्थिक व्यवहार आणि ऑनलाइन पेमेंटशी संबंधित अनेक नियम बदलतील. तसेच अनेक उत्पादने महाग होतील. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर काही बोजा तुमच्या खिशावरही पडू शकतो. याशिवाय काही करप्रणाली, शेअर बाजार आणि कामगार नियमांमधील सुधारणा १ जुलैपासून लागू होऊ शकतात.
१ जुलैपासून सर्व क्रिप्टो व्यवहारांवर कर आकारला जाईल. सरकार १ टक्के टीडीएस लावणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीमद्धे तोटा झाला तरी हा कर भरावा लागणार आहे. सरकारने आधीच क्रिप्टो उत्पन्नावर भांडवली लाभ कर लावला आहे.
१ जुलैपासून देशात दुचाकींच्या किमती वाढणार आहेत. हिरो मोटोकॉर्पने आपल्या वाहनांच्या किमती ३,००० रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढती महागाई आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमती पाहता कंपनीकडून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, हिरो मोटोकॉर्प प्रमाणे इतर कंपन्याही त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवू शकतात.
१ जुलैपासून देशात दुचाकींबरोबरच एसीही महागणार आहेत. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी ने एअर कंडिशनर्ससाठी (एसी) ऊर्जा रेटिंग नियम बदलले आहेत. हे बदल १ जुलैपासून लागू होणार आहेत. यानंतर ५ स्टार एसीचे रेटिंग थेट ४ स्टारवर कमी होईल. नवीन ऊर्जा कार्यक्षमतेच्या अंमलबजावणीनंतर एसीच्या किमती १० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.