IPL 2026 दरम्यान सर्वात मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम

WhatsApp Group

आयपीएल २०२६ चा थरार शिगेला पोहोचलेला असतानाच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एका अनुभवी खेळाडूने एक्झिट घेतली आहे. बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज रुबेल हुसेन याने वयाच्या ३६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. बुधवारी (१५ एप्रिल) सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली. २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचे दाबे दणाणून सोडणारा गोलंदाज म्हणून रुबेलची ओळख कायम राहील.

फेसबुकवर भावूक पोस्ट शेअर करत दिला निरोप

रुबेल हुसेनने फेसबुकवर एक इमोशनल पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “बांगलादेशसाठी खेळणे माझ्यासाठी केवळ क्रिकेट नव्हते, तर ती एक भावना होती. राष्ट्रीय संघाची जर्सी नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहील. मी माझ्या देशासाठी २७ कसोटी, १०४ वनडे आणि २८ टी-२० सामने खेळलो. प्रत्येक प्रवासाचा शेवट हा असतोच, तसाच आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देत आहे,” असे रुबेलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, तो देशांतर्गत (Domestic) क्रिकेट खेळणे सुरूच ठेवणार आहे.

२०१५ वर्ल्ड कपचा तो ऐतिहासिक स्पेल!

रुबेल हुसेनच्या कारकिर्दीतील सर्वात सुवर्ण क्षण म्हणजे २०१५ चा एकदिवसीय विश्वचषक. इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक सामन्यात रुबेलने १४५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत ४ बळी टिपले होते. त्याने स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांना सलग चेंडूंवर बाद करून इंग्लंडला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. या विजयामुळेच बांगलादेशने प्रथमच विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.

अशी राहिली कारकीर्द

  • कसोटी: २७ सामन्यात ३६ बळी.

  • एकदिवसीय (ODI): १०४ सामन्यात १२९ बळी.

  • टी-२०: २८ सामन्यात २८ बळी. २००९ मध्ये पदार्पण करणाऱ्या रुबेलने २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.