धर्मशाला – श्रीलंकेविरुद्ध काल झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यामध्ये रोहित शर्मा आपल्या बॅटने फारशी चमक दाखवू शकला नाही. रोहित शर्मा काल झालेल्या सामन्यात स्वस्तात बाद झाला. पण संघाचा कर्णधार म्हणून मधल्या फळीच्या कामगिरी पाहता रोहित शर्मा नक्कीच खूष असेल. श्रीलंकेच्या 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना भारताने दोन विकेट लवकर गमावले.
पण श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा आणि संजू सॅमसन या तिघांनी श्रीलंकेची गोलंदाजी फोडून काढली. एक अवघड वाटणारे मोठं लक्ष्य भारताला सहज पार करता आले. या तिघांनी श्रीलंकन गोलंदाजांवर अक्षरक्ष: हल्लाबोल केला. भारताने हा सामना 17 चेंडू राखून विजय मिळवला. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये आता भारतीय संघ 2-0 ने आघाडीवर आहे. तर आजचा सामना हा फक्त औपचारिकता मात्र आहे.
काल झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजा श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई करत असताना, कॅमेरामनने कॅमेरा ड्रेसिंग रुमकडे फिरवला. त्यावेळी रोहित शर्माच्या हातात गरम कॉफीचे ग्लास होते. धर्मशाळाच्या थंडगार वातावरणामध्ये रोहित शर्मा गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत होता.
Just what you need in the cold Dharamsala weather ☕️@ImRo45 pic.twitter.com/xUgz8W9ERR
— BCCI (@BCCI) February 26, 2022
कॉफीचे घोट घेत असताना, कॅमेरा आपल्याकडे आहे, हे चटकन रोहितच्या लक्षात आले. त्यावेळी त्याने कॅमराकडे पाहून कॅमेरामनला कॉफी घेणार का? म्हणून विचारणा केली. त्यावेळी रोहितच्या चेहऱ्यावर हास्य होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर चांगलाचं वायरल होतं आहे.