
मुंबई: आयपीएलचा 18 वा हंगाम रंगतदार वळणावर आला असताना, आज मंगळवार, 6 मे रोजी चाहत्यांना दोन शेजारी संघांमधील थरारक सामना पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी 7:30 वाजता मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने भिडणार आहेत.
मुंबई इंडियन्सने कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात सलग सहा सामने जिंकून शानदार पुनरागमन केलं आहे. सुरुवातीला खराब फॉर्ममुळे टीकेचा सामना करावा लागलेल्या संघाने आता प्ले-ऑफच्या शर्यतीत आपली जागा जवळ जवळ पक्की केली आहे.
या सामन्यात सर्वांचे लक्ष असेल ते मुंबईचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याच्यावर. गेल्या काही सामन्यांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या रोहितसमोर आज घरच्या मैदानावर एक खास विक्रम साध्य करण्याची संधी आहे.
𝐑𝐎. Wankhede. Matchday. 🥶🔥#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvGT pic.twitter.com/J9qglToQXR
— Mumbai Indians (@mipaltan) May 6, 2025
आतापर्यंत आयपीएल कारकिर्दीत रोहितने 297 षटकार ठोकले आहेत. त्यामुळे गुजरातविरुद्ध आज केवळ 3 षटकार मारले, तर तो आयपीएलमध्ये 300 सिक्सर मारणारा विशेष क्लबमध्ये सामील होईल.
रोहित आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने मुंबईला आपल्या नेतृत्वाखाली 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. यंदाच्या हंगामात तो केवळ फलंदाज म्हणून खेळतो आहे आणि आपल्या भूमिकेला यथार्थ न्याय देतो आहे.
आजच्या सामन्यात रोहितचा फॉर्म आणि विक्रमाची संधी पाहता, क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना विशेष ठरणार आहे.