अखेर विराट कोहली कप्तानपदाच्या काटेरी मुकुटपासून दूर झाला, किंवा केला गेला. दोन्हीत फारसा फरक नाही. सचिन तेंडुलकर नंतरच्या भारताच्या सर्वोत्तम एकदिवसीय आणि कसोटी फलंदाजाला ‘अशा’ पद्धतीने पायउतार व्हावे लागणे किंवा पायउतार केले जाणे हे बऱ्याच जणांना खटकले असेल. आखिर भारत के वर्तमान के सर्वश्रेष्ठ बल्लेबाज की कोई कीमत है या नही?!!
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाआधीच विराटने त्या प्रकारच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोडणार असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे तिथे हा निर्णय त्याच्या परस्पर घेतला नव्हता हे नक्की. अर्थात हे कर्णधारपद सोडण्यात त्याची मनापासून सहमती असेलच असेही नाही. सातत्याने कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात आलेले अपयश हे त्याच्या राजीनाम्याचे कारण मानले गेले तर ते कारण एकदिवसीय प्रकारासाठीही तितकेच संयुक्तिक आहे. कारण भारतीय संघाला कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकून आठ वर्षे होऊन गेली आहेत! शिवाय ट्वेन्टी ट्वेन्टी मध्ये असलेला कर्णधार एकदिवसीय प्रकारात कायम ठेवण्याचा कल एकंदरीतच क्रिकेटमध्ये दिसतो. अनेक देशांचे एकदिवसीय आणि 20-20 कर्णधार एक आणि कसोटीचा वेगळा अशी पद्धत दिसून येते.
त्यामुळे त्या प्रथेला अनुसरूनच कोहली ने 20-20 कर्णधारपद सोडल्यावर एकदिवसीय कर्णधारपद देखील सोडेल अशी अपेक्षा रोहित शर्मा बरोबरच बहुतांश क्रिकेटप्रेमींची असावी. “शर्मा जी का बेटा” तसाही बरेच दिवस त्या करता रांगेत उभा होता. परंतु कोहलीच्या मनात जे काही होते ते त्याने व्यवस्थितपणे बीसीसीआयला कळवले नसावे किंवा कळवले असेल तर सौरव गांगुली आणि बीसीसीआयला ते मान्य नसावे. त्यामुळे गांगुलीच्या म्हणण्यानुसार त्याला योग्य तेवढा वेळ दिल्यानंतर देखील कोहलीने कोणतीही घोषणा केली नाही आणि बीसीसीआयने स्वतःहूनच ही घोषणा केली.
हे करताना एकंदरीतच कोहली हा अत्यंत नालायक कर्णधार असावा अशी धारणा होण्याचा संभव आहे. त्याला कारण आहे ते या निर्णयानंतर क्रिकेटप्रेमींच्यात पडलेले दोन गट. एक गट आहे रोहित शर्मा समर्थकांचा, तर दुसरा विराट समर्थकांचा. दोन्ही गटांत अर्थातच कोणत्याही बाबतीत एकमत नाहीये. आयपीएल रेकॉर्ड बघता रोहित शर्मा हा सुयोग्य कर्णधार असल्याचे त्याच्या समर्थकांचे मत असून त्या विभागात कोहलीचे आकडे “शर्म”नाक म्हणावेत असे आहेत. आरसीबी कडून खेळताना कोहली जिंकण्यापेक्षा “ट्रोल” अधिक झालाय.
परंतु त्याची एकदिवसीय कर्णधारिय आकडेवारी बघितली तर ती नक्कीच उत्तम म्हणता येईल अशी आहे. विराटने ९५ एकदिवसीय सामन्यांत भारताचे नेतृत्व केले असून त्यात ६५ विजय, २७ पराभव आणि ३ अनिर्णित अशी कामगिरी केली आहे, जी कोणत्याही कोनातून उत्तम म्हणता येईल. परंतु कोणत्याही कर्णधाराला “यशस्वी” शिक्का मिळण्यासाठी आवश्यक असलेली आयसीसी स्पर्धा विजयाचा टिळा लागलेला नाही. त्यामुळे परीक्षेत बोर्डात येण्यासाठी आवश्यक आकडेवारीच्या एक दोन टक्के कमी मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यासारखी त्याची स्थिती झाली. अशावेळी धड मिळालेल्या मार्कंचे कौतुक होत नाही किंवा बोर्डात येण्याची संधी थोडक्यात हुकल्यामुळे अगदीच वाईट मार्क नसल्याने धड चुकाही काढता येत नाहीत. मोठीच कोंडी असते. विराट कोहली देखील याच मनस्थितीत असावा.
शिवाय नेतृत्वाबरोबरच कर्णधाराचा फॉर्म देखील तितकाच महत्वाचा असतो. त्यात देखील कोहलीचा फलंदाजीचा आलेख गेली दोन वर्षे भलताच घसरलाय. दोन वर्षांत त्याला एकही कसोटी एकदिवसीय शतक करता आलेले नाही. त्यामुळे तिकडे देखील त्याला लक्ष देणे क्रमप्राप्त होते. अर्थात त्याच्या मोजपट्टीने बघता हा आलेख घसरलेला दिसतो तरीही तो अन्य फलंदाजांच्या तुलनेत बराच ‘बरा’ आहे. आता दोन प्रकारच्या कर्णधारपदाच्या ओझ्यातून बाहेर पडल्यावर तो तिकडे मनाजोगते लक्ष देऊ शकेल. त्यातून प्रच्छन्न पणे गोलंदाजांना फोडणारा बॅट्समन कोहली दिसेल अशी अपेक्षा करणे गैर नाही.
रोहित शर्माकडे आता बरेच ‘हाईप’ झालेले कर्णधारपद आल्यावर येणारे दडपण अधिकचे असेल. शिवाय फॅन्सच्या युक्तिवादात नेहेमी दिसणारे आयपीएल विक्रम तिथे कमी येणार नाहीत. यामागे साधी गोष्ट अशी की, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा यातील स्पर्धात्मकता यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. त्यामुळे आयपीएल मध्ये कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी असली तरीही त्याची मदत आयसीसी स्पर्धांत नसेल. शिवाय कर्णधार झाल्यावर शर्माला आपली छाप देखील पाडावी लागेल ती संघसहकाऱ्यांवर आणि चाहत्यांवर तसेच निवडसमितीवर देखील. त्यामुळे ही जबाबदारी तिहेरी असणार आहे. रोहित शर्मा मैदानात शांत असतो, त्यामागे शांतपणा किती आणि आळस किती हा संशोधनाचा विषय असेल. असो.
पुढील दृष्टीने देखील हा बदल महत्वाचा आहे. भविष्याचा विचार करून रोहितला एकदिवसीय संघात भविष्यातील खेळाडू, कर्णधार यांना तयार करायचे आहे. गेली दोनेक वर्षे संघात पडलेल्या अदृश्य फटीमुळे हे काम जवळपास ठप्प पडले आहे. ही दुफळी अगदी उघड नसली तरी ती होती हे अवघ्या देशाला माहीत होते. ही फूट लवकरात लवकर मिटवून दोघांनीही संघासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. फलंदाजी,गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यामध्ये झालेली पडझड सावरणे, हे देखील महत्वाचे काम रोहित शर्मापुढे असेल, त्यात त्याला विराटच्या मदतीची गरज लागेल आणि विराट ती करेल अशी खात्री आहे. Both are that much professionals.
हे बदल आवश्यक देखील असतात, भाकरी फिरवली नाही तर करपते. त्यामुळे कर्णधारपदाची ही भाकरी बीसीसीआयने फिरवली हे चांगलेच केले.