IND vs ENG: दणदणीत विजयानंतर ‘हिटमॅन’ने हुक आणि पुल शॉट्सवर केलं मोठं विधान, म्हणाला…

WhatsApp Group

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या घातक गोलंदाजी आणि त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने मंगळवारी लंडनच्या केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 10 विकेटने पराभव केला. या धमाकेदार विजयानंतर रोहित शर्माने वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले. त्याचबरोबर भविष्यात पुल आणि हुक शॉट्स खेळण्याबाबतही मोठं वक्तव्य केलं.

तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “खेळपट्टी आणि हवामानाचा विचार करून प्रथम गोलंदाजी करणे हा योग्य निर्णय होता. आम्हाला परिस्थितीचा फायदा घ्यायचा होता. आम्ही ते करू शकलो. म्हणून सुरुवातीला आम्हाला यश मिळाले.

वेगवान गोलंदाजांच्या घातक गोलंदाजीबाबत रोहित म्हणाला की, परिस्थिती कशी आहे याची आम्हाला चिंता नाही. आम्ही खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार गोलंदाजी करतो. खेळपट्टी सपाट असल्याचे आम्ही टी-20 सामन्यांदरम्यान पाहिले, परंतु पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाजांसाठी परिस्थिती अनुकूल होती. सुरुवातीला गोलंदाजांना सीम आणि स्विंग दोन्ही मिळत होते.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात आपल्या अर्धशतकी खेळीत कर्णधार रोहित शर्माने 5 षटकार ठोकले. यामध्ये त्याने हुक आणि पुल शॉट्स मारत सर्वाधिक षटकार मारले. याबद्दल रोहित म्हणाला, पुल आणि हुक शॉट्स हे सर्वात जोखमीचे असतात पण मला ते खेळायला आवडतात. जोपर्यंत या शॉट्सला षटकार मिळत आहेत, तोपर्यंत मी ते शॉट्स खेळत राहीन आणि ते करण्यात मला आनंद आहे.