T20 World Cup 2024: रोहित शर्माच टी-20 वर्ल्ड कपसाठी कर्णधार, पंड्याचा पत्ता कट

WhatsApp Group

T20 World Cup 2024 Captain: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ आता 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकण्याकडे लक्ष देत आहे. जूनपासून सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभात 16 संघ सहभागी होणार आहेत. यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. मात्र, त्याआधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले आहे की, 2024 च्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे कर्णधारपद कोणता खेळाडू दिसणार आहे. जय शाहच्या या वक्तव्यानंतर हा फलंदाज 2024 च्या टी-20 विश्वचषकात गोलंदाजांना क्लास देताना दिसणार हे निश्चित झाले आहे.

BCCI सचिव जय शाह यांनी पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्मावर टी-20 विश्वचषक 2024 च्या कर्णधारपदासाठी विश्वास व्यक्त केला आहे. जय शाह म्हणाले की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत टी-20 विश्वचषक 2024 मध्ये खेळणार आहे. जय शाह म्हणाले की, सलग 10 विजय नोंदवूनही 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी जिंकता आली नसली तरी आम्ही करोडो लोकांची मने जिंकली आहेत. ते पुढे म्हणाले की, मी तुम्हाला वचन देतो की आम्ही रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी नक्कीच उचलू.

उपकर्णधार कोण? 

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या खांद्यावर विश्वचषकात उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे, असेही शाह यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियमचे नाव बदलण्याची घोषणाही करण्यात आली. या स्टेडियमचे नाव आता निरंजन शाह स्टेडियम असे ठेवण्यात येणार आहे. माजी क्रिकेटपटू निरंजन शाह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.  रोहित शर्माचा संघ टी-20 विश्वचषक जिंकण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला आहे. जय शाह यांनी यावेळी गतवर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक करत आनंद व्यक्त केला. मात्र, वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

आगामी टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु होती. 2022 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा प्रवास उपांत्य फेरीत संपला होता. यानंतर रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या संघाची धुरा सांभाळत होता. पण जानेवारीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली 14 महिन्यांनंतर टी-20 संघात परतले. रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-20 सामन्यातही शतक झळकावले. तेव्हापासून, रोहित शर्मा यंदाच्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची धुरा सांभाळेल,अशी अपेक्षा होती. दरम्यान,  रोहितच्या नेतृत्वात टीम इंडिया विश्वचषक खेचून आणणार का? याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.

भारत आणि पाकिस्तान सामना कधी?

ICC टी-20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले आहे, ज्यामध्ये भारताला पाकिस्तान, आयर्लंड, यूएसए आणि कॅनडासह समान गटात ठेवण्यात आले आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे, तर भारतीय संघ ९ जूनला न्यूयॉर्कच्या मैदानावर पाकिस्तानशी भिडणार आहे. याशिवाय 12 जूनला अमेरिका आणि 15 जूनला कॅनडा असेल.