Rohit Sharma Birthday: ‘मुंबईचा राजा’ झाला 38 वर्षांचा! जाणून घ्या त्याच्या मोठ्या विक्रमांची यादी

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज (30 एप्रिल) रोजी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.  रोहित शर्माचे चाहते सोशल मीडियावर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने 2024 वर्ल्ड कप आणि 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे, हे एक ऐतिहासिक यश आहे. रोहित शर्मा, जो आपल्या शांत आणि सामर्थ्यवान नेतृत्वासाठी ओळखला जातो, त्याने भारताच्या क्रिकेट इतिहासात महत्वाची भूमिका बजावली आहे. जून 2007 मध्ये भारताकडून वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत अनेक आव्हानांना सामोरे जात, एक नवा आदर्श उभा केला आहे.

रोहित शर्माने आतापर्यंत वनडेत 273 सामने खेळले असून, त्यात 11168 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने 67 टेस्ट सामन्यांत 4302 धावा आणि 159 टी 20 सामन्यांत 4231 धावा केल्या आहेत. यामुळे तो सर्व फॉरमॅटमध्ये भारताच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक ठरला आहे.

जाणून घ्या रोहितच्या नावावर असलेले हे खास विक्रम

  • आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा रोहितच्या नावावर आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1 आणि श्रीलंकेविरुद्ध 2 अशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतके ठोकली आहेत. एवढेच नव्हे तर तर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम देखील रोहितने नोंदवला आहे. रोहितने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 264 धावांची खेळी केली होती.
  • टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक 4 टी-20 शतके आहेत. यातील एक श्रीलंकेविरुद्धचं शतक तर रोहितने इंदोर 35 चेंडूत पूर्ण केले होते.
  • 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने 5 विश्वविक्रमी शतकांसह 9 सामन्यात 648 धावा केल्या. शिवाय एका विश्वचषक स्पर्धेत पाच शतकं करणारा रोहित पहिला खेळाडू होता.

मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माची ऐतिहासिक कामगिरी

आयपीएल 2022 मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मासाठी चांगले गेले नाही, परंतु तरीही तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आणि सर्वाधिक विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्स संघ आहे. रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवले आहे.