
सूर्यकुमारच्या धमाकेदार खेळीच्या बळावर भारताने मंगळवारी तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात भारताला 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करत भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला फलंदाजी करताना दुखापत झाली होती, मात्र 5 चेंडू खेळून रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी रोहित शर्माने एका खास विक्रमाच्या बाबतीत T20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीला मागे टाकले आहे.
रोहित शर्माने कर्णधार म्हणून क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या तिसऱ्या सामन्यात रोहितने ही कामगिरी केली. या सामन्यापूर्वी रोहित आणि कोहलीच्या खात्यात 59-59 षटकार होते. मात्र तिसऱ्या सामन्यात षटकार ठोकत रोहितने हा विक्रम केला. तिसऱ्या T20 मध्ये डावाच्या दुसऱ्या षटकात रोहितने अल्झारी जोसेफच्या चेंडूवर षटकार ठोकला. त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर रोहित पाठीच्या दुखण्यामुळे 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
24 तासांच्या आत सलग दुसरा सामना खेळणाऱ्या टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगली सुरुवात करूनही वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 5 गडी गमावून 164 धावाच करू शकला. ब्रँडन किंग आणि मेयर्स यांनी पहिल्या विकेटसाठी 44 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माच्या पाठीच्या स्नायूमध्ये ताण आला आणि अवघ्या 5 चेंडू खेळून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर पंत आणि श्रेयससह सूर्यकुमारने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.