
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्या टी-20 सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) 20 चेंडूत 31 धावा केल्या. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 3 चौकार लगावले. यासह तो टी-20 मध्ये 300 चौकार मारणारा भारतातील पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.
रोहित शर्माने नाणेफेकीदरम्यान सांगितले होते की, त्यांचा संघ आक्रमक पद्धतीने खेळेल. सामन्यातही असेच घडले, ऋषभ पंतसोबत सलामी देणाऱ्या रोहित शर्माने आक्रमक पद्धतीने सुरुवात केली. रोहितने पहिल्याच षटकापासून मोठे फटके मारायला सुरुवात केली.
रोहित शर्मा या सामन्यात 31 धावा करत बाद झाला. इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या रिचर्ड ग्लीसनने रोहित शर्मला बाद केले. मात्र आऊट होण्यापूर्वी रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. टी-20 मध्ये 300 चौकार मारणारा भारतातील पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. रोहितच्या नावावर 301 चौकार आहेत आणि जगात फक्त एकच फलंदाज आहे जो या बाबतीत रोहितच्या पुढे आहे.
आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगच्या नावावर टी-20 मध्ये 325 चौकार आहेत आणि रोहित शर्मा स्टर्लिंगनंतर जगात सर्वाधिक चौकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. पहिल्या 298 चौकारांसह तो तिसऱ्या क्रमांकावर होता.