वनडेमध्ये 250 षटकार मारणारा रोहित शर्मा ठरला पहिला भारतीय; पाँटिंग, रिचर्ड्स सारख्या दिग्गजांना टाकलं मागे

लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाबाद 76 धावांची खेळी करून भारताला 10 गडी राखून मोठा विजय तर मिळवून दिलाच शिवाय अनेक विक्रमही रचले. रोहितने 76 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 5 षटकार मारले. यासोबतच रोहितने वनडेमध्ये 250 षटकार पूर्ण करण्याचा मोठा विक्रमही केला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित हा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा चौथा फलंदाज ठरला. या बाबतीत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी पहिल्या क्रमांकावर तर ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या खेळीमुळे रोहित शर्मा इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. याबाबतीत त्याने न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला मागे टाकलं आहे. भारताचा विराट कोहली हा इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या सामन्यात शिखर धवनने रोहित शर्माला चांगली साथ देत भारताला विजय मिळवून दिला आणि पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे धवन आणि रोहित ही जोडी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण करणारी भारतातील दुसरी आणि जगातील चौथी सलामी जोडी ठरली. या बाबतीत सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही जोडी अव्वल स्थानावर आहे, ज्यांच्या नावावर ओपनिंग जोडी म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6609 धावा आहेत.
वनडेमध्ये सर्वाधिक षटकार
351 – शाहिद आफ्रिदी
331 – ख्रिस गेल
270 – सनथ जयसूर्या
250 – रोहित शर्मा
229 – एमएस धोनी
इंग्लंडमध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा
1411 – रोहित शर्मा
1393 – केन विल्यमसन
1387 – रिकी पाँटिंग
1345 – व्हिव्ह रिचर्ड्स
1316 – विराट कोहली