T-20 क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकणारा रोहित शर्मा ठरला पहिला भारतीय फलंदाज
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (MI) माजी कर्णधार रोहित शर्माने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या या सामन्यात त्याने आपल्या डावातील तिसरा षटकार ठोकताच, त्याने T-20 क्रिकेटमधील 500 षटकार पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो जगातील 5वा आणि भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे.
या फलंदाजांनी टी-20 क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकले आहेत
ख्रिस गेलने (1,056) टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. या फॉरमॅटमध्ये 1000 हून अधिक षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. किरॉन पोलार्ड दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 660 सामन्यांमध्ये 860 षटकार मारले आहेत. आंद्रे रसेलने 486 सामन्यात 678 षटकार तर न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या कॉलिन मुनरोने 428 सामन्यात 548 षटकार ठोकले आहेत. रोहितनंतर सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू विराट कोहली (383) आहे.
𝙃𝙞𝙩𝙢𝙖𝙣 for a reason 🙇♂️#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvCSK pic.twitter.com/AyJRslcbGt
— Mumbai Indians (@mipaltan) April 14, 2024
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा रोहित तिसरा फलंदाज
रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 262 सामने खेळले आहेत. त्याच्या 254 डावांमध्ये त्याने 36 वेळा नाबाद राहताना 10,709 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या बॅटने 31 शतके आणि 55 अर्धशतके केली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 323 षटकार मारले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये फक्त गेल (331) आणि शाहिद आफ्रिदी (351) यांनी त्याच्यापेक्षा जास्त षटकार मारले आहेत.
महेंद्रसिंग धोनी या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने 350 सामन्यांमध्ये 229 षटकार मारले आहेत.