अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे – मंत्री प्रताप सरनाईक

WhatsApp Group

मुंबईदि. ०५: रस्त्यावरील होणारे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. यासाठी  रस्ता  सुरक्षा  निधीतून  प्राधान्याने घेण्यात येणाऱ्या कामांसह निधी वापराबाबत नियमावली तयार करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात रस्ता सुरक्षा निधीबाबत, ऑटो-रिक्षा व मिटर्स टॅक्सी भाडे नाकारण्याच्या तक्रारीसंदर्भात उपाययोजना करणे, मोटार वाहन विभागातील ऑनलाईन बदली धोरण आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जाहिरात धोरणाबाबत बैठक झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, एस. टी. महामंडळाचे अधिकारी देशमुख यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

रस्ता सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत मंत्री सरनाईक म्हणाले, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. जनजागृतीसाठी ब्रँड अँबेसिडरची नियुक्ती करावी. सर्व रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. याबरोबरच रस्त्यावर झेब्रा क्रॉस यासह आवश्यक मार्किंग चिन्हे करण्यात यावीत.

एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे, यासाठी जाहिरात धोरणाचा मसुदा तयार करावा. जाहिरात व पार्सल सेवेतून एस. टी. महामंडळास अधिकचे उत्पन्न मिळाले पाहिजे याचे नियोजन करावे. उत्पन्न वाढीसाठी कोल्ड स्टोरेज सारखा प्रकल्प राबविण्याचा महामंडळाने विचार करावा. तसेच प्रवाशांना ऊन, वारा पाऊस याचा त्रास होऊ नये म्हणून या पुढील काळात नवीन एस.टी निवारे बांधतांना ते बंदिस्त पद्धतीचे  बांधावेत तसेच एस.टी निवारे पी.पी.पी. तत्वावर करण्याबाबतचाही अभ्यास करण्यात यावा.

सर्व मीटर रिक्षांना इंडिकेटर लावण्याच्या सूचना परिवहन प्राधिकरणाला दिल्या जातील तसेच बाईक टॅक्सी मधून रोजगार निर्माण होणार असल्याने या योजनेमध्ये काही सुधारणांबाबत आवश्यक मार्ग काढला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मोटार वाहन विभागात राबविण्यात येणारे ऑनलाईन बदली धोरण सर्वसमावेशक असावे. राज्य शासनाच्या अन्य विभागात ऑनलाइन बदली धोरण कशा प्रकारे राबवले जाते याची माहिती घेण्यात यावी, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.