पुन्हा अतिवृष्टीचा धोका! 17 राज्यांना IMD चा रेड अलर्ट, तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट

WhatsApp Group

देशभरात पुन्हा एकदा हवामानात लक्षणीय बदल होताना दिसत आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सायक्लोनिक सर्कुलेशनमुळे वातावरण ढगाळ झाले असून, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार एकूण 17 राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत पावसाचा जोर जाणवणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये बर्फवृष्टीसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. यावेळी वाऱ्याचा वेग प्रतितास 60 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही भागांत हलक्याशा सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. दिल्लीत मात्र हवामान ढगाळ राहणार असलं तरी पावसाची शक्यता सध्या कमी आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात मात्र तापमानात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून, चंद्रपूर जिल्ह्यात तापमान 45.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे, जे राज्यातील सर्वात जास्त आहे. तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानं नागपूर, अकोला, यवतमाळसारख्या जिल्ह्यांत नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून पुढील काही दिवस सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं असून, पावसाच्या संभाव्य भागांत रहिवाशांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच, उष्णतेच्या झळा बसू नयेत म्हणून महाराष्ट्रातील नागरिकांनी पाणी भरपूर पिणं, उन्हापासून संरक्षण करणं आणि शक्यतो दुपारी घराबाहेर जाणं टाळावं, अशी सूचना देण्यात आली आहे.