Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

WhatsApp Group

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी पहाटे रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्याची कार एका रेलिंगला धडकली. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पायालाही फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. अद्याप पोलिस, प्रशासन किंवा रुग्णालय व्यवस्थापनाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभची कार रेलिंगला धडकली आणि आग लागली. बऱ्याच अडचणींनंतर गाडी नियंत्रणात आणली. पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंत त्यांची बीएमडब्ल्यू कार चालवत असल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. अशा परिस्थितीत तो दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहू शकतो. अलीकडेच त्याला टीम इंडियातूनही वगळण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी पंतला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे वृत्त होते आणि बीसीसीआयने त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे (एनसीए) अहवाल देण्यास सांगितले आहे.आता या घटनेनंतर पंतच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पंत यांच्याविषयी माहिती मिळाली असून त्यांनी पंतच्या उपचारासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

नुकतेच श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांची टी-20 संघात निवड झालेली नाही. पण एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघाचा पंतही भाग नाही. त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला एनसीएमध्ये पुनर्वसनासाठी पाठवण्यात आले होते. श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका ३ जानेवारीपासून सुरू होत आहे. त्याच वेळी, 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. त्याचबरोबर बांगलादेशविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पंतने 93 धावांची शानदार खेळी केली. भारताने कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली होती.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा