नो बॉलवरून संतापलेला दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत, शार्दुल ठाकूरवर कारवाई तर प्रवीण आमरेंवर बंदी

WhatsApp Group

आयपीएल 2022 सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाचा कर्णधार ऋषभ पंतने सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. पंतला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी मानून आयपीएलने दंड ठोठावला आहे. त्याच्यासह संघाचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.

शुक्रवारी दिल्ली संघ राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना खेळला होता, ज्यामध्ये ऋषभ पंतच्या संघाला 15 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यातील शेवटच्या षटकात नो-बॉलचा वादही झाला होता. यादरम्यान ऋषभ पंतने रागाच्या भरात आपल्या फलंदाजांना माघारी बोलावण्याचे संकेत दिले होते. त्यासाठी त्यांनी आमरे यांनाही मैदानात पाठवले होते. या प्रकरणात शार्दुलने दोघांनाही पाठिंबा दिला होता. यासाठी तोही आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे.

ऋषभ पंतला मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तर शार्दुल ठाकूरला मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. ऋषभ पंतला आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल-2 अंतर्गत कलम 2.7 च्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. शार्दुलला आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल-2 अंतर्गत कलम 2.8 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे.

अंपायरशी वाद घालण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्ली संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांना चांगलीच शिक्षा झाली आहे. त्यांना मॅच फीच्या 100 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्यावर पुढील एका सामन्याची बंदीही घालण्यात आली आहे. अमरे यांना आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल-2 अंतर्गत कलम 2.2 च्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे.