
Asia Cup 2022: भारतीय संघाकडे सध्या एकापेक्षा जास्त यष्टिरक्षक आहेत. सध्या संघात दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि इशान किशन या यष्टीरक्षकांचा समावेश आहे. साहजिकच पंतला संघाची पहिली पसंती आहे, पण कार्तिकनेही क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून पंतला तगडी स्पर्धा दिली आहे. आशिया चषक 2022 साठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी पंत आणि कार्तिक यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. आगामी स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान मिळेल, याचे उत्तर खुद्द युवा यष्टिरक्षक पंतनेच दिले आहे.
झी हिंदुस्थानशी संवाद साधताना एका प्रश्नाला उत्तर देताना पंत म्हणाला, “आम्ही याचा विचार करत नाही. आम्ही वैयक्तिकरित्या नेहमीच आमचे 100 टक्के संघाला देऊ इच्छितो. बाकी सर्व प्रशिक्षक आणि कर्णधारावर अवलंबून आहे.
18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेमध्ये खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी पंत आणि कार्तिक यांची भारतीय संघात निवड झालेली नाही. हे दोघेही आता थेट आशिया कप 2022 मध्ये खेळतील, जिथे भारत दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळेल.
पंतने गेल्या 10 डावात 171 धावा केल्या आहेत, तर कार्तिकने 155 धावा केल्या आहेत. पंतची सर्वोच्च धावसंख्या 44 आहे तर कार्तिकची सर्वोच्च धावसंख्या 55 आहे. पंतचा वापर वेगवेगळ्या बॅटिंग पोझिशनमध्ये झाला आहे, तर कार्तिकचा वापर फक्त फिनिशर म्हणून केला गेला आहे.