
ऋषभ पंतने पहिले एकदिवसीय शतक झळकावल्यामुळे भारताने रविवारी ओल्ड ट्रॅफर्ड येथे विश्वविजेत्या इंग्लंडचा पाच विकेट्सनी पराभव करून तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली. हार्दिक पांड्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत 24 धावांत 4 बळी घेतले आणि त्यानंतर इंग्लंडला 259 धावांत गुंडाळले. 260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंतने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने नाबाद 125 धावांची शतकी खेळी करत संघाला 5 गडी राखून विजय मिळवून दिला.
एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावताच पंतने माजी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. वनडेत लक्ष्याचा पाठलाग करताना शतक झळकावणारा पंत हा तिसरा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी धोनीने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद 183 धावांची खेळी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शतक झळकावणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत पंत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्याशिवाय या यादीत राहुल द्रविडचाही समावेश आहे, ज्याने 2002 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 109 धावांची खेळी केली होती.
पंतने हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी १३३ धावांची शतकी भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला आणि मालिकाही जिंकून दिली. पंड्याने 55 चेंडूत 71 धावांचे योगदान दिले. आशियाबाहेर शतक झळकावणारा पंत हा तिसरा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी राहुल द्रविड आणि केएल राहुल यांनी हा पराक्रम केला आहे.