
पुणे – शहरातील बुधवार पेठ परिसरात एका महिलेच्या खूनाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. श्यामली सरकार (वय अंदाजे ३५) या महिलेचा खून तिचा परिचित रिक्षाचालक नितीन पंडित याने केल्याची घटना ४ जून रोजी दुपारी घडली. श्यामली ही बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करत होती, तर पंडित दररोज तिला रिक्षातून सोडण्याचे काम करायचा.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नितीन पंडित याने श्यामलीला ४० ते ५० हजार रुपये उधार दिले होते. मात्र, श्यामलीने पैसे परत देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. ४ जून रोजी दुपारी सुमारे ४ वाजता नितीन पंडित धायरी येथील रायकर मळा परिसरात श्यामलीच्या घरी गेला होता. तेथे त्यांच्यात वाद झाल्यानंतर पंडितने संतापाच्या भरात तिचा कपड्याने गळा आवळून खून केला.
खून केल्यानंतर पंडित थेट पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली आणि न्यायालयात हजर केले. ६ जून रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नितीन पंडितला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. श्यामलीच्या मृत्यूमागील नेमके कारण, दोघांमधील आर्थिक व्यवहाराची पार्श्वभूमी आणि इतर शक्यतांवरही चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे बुधवार पेठ आणि धायरी परिसरात खळबळ उडाली आहे.