हल्लीच्या धावपळीच्या काळात तरुणांची, विशेषतः ‘जनरेशन झेड’ (Gen-Z) ची जीवनशैली वेगाने बदलत आहे. फॅशन आणि तंत्रज्ञानासोबतच त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही मोठे बदल होत आहेत. सध्या पार्ट्यांमध्ये पारंपरिक बिअरपेक्षा ‘राईस बिअर’ (Rice Beer) पिण्याचा ट्रेंड तरुणाईमध्ये प्रचंड वाढताना दिसत आहे. अनेकांना असे वाटते की ही बिअर आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण यात कितपत तथ्य आहे? राईस बिअर नक्की काय आहे आणि तज्ज्ञ याबद्दल काय सांगतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
राईस बिअर म्हणजे नक्की काय?
राईस बिअर ही प्रामुख्याने तांदूळ आंबवून (Fermented Rice) तयार केली जाते. ही बिअर पारंपरिक बिअरच्या तुलनेत चवीला हलकी, स्मूद आणि कमी कडू असते. आशियाई देशांमध्ये राईस बिअर पिण्याची परंपरा जुनी असली, तरी आता आधुनिक मार्केटिंग आणि ‘लाईट बिअर’च्या क्रेझमुळे Gen-Z तरुणांमध्ये ती लोकप्रिय होत आहे. कमी कडू आणि रिफ्रेशिंग वाटत असल्याने अनेक तरुण याला पसंती देत आहेत.
राईस बिअर खरंच ‘हेल्दी’ आहे का?
गोरखपूर येथील रीजेंसी हॉस्पिटलचे डॉ. विजय कुमार शर्मा यांच्या मते, राईस बिअरमध्ये थायमिन (B1), राइबोफ्लेविन (B2) आणि नियासिन (B3) यांसारखी व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स काही प्रमाणात आढळतात. मात्र, केवळ यामुळे राईस बिअरला ‘हेल्दी ड्रिंक’ म्हणणे चुकीचे ठरेल. तांदळापासून बनलेली असली तरी यात अल्कोहोलचे प्रमाण असतेच, जे शरीरासाठी घातक ठरू शकते.
आरोग्यावर होणारे परिणाम
राईस बिअर दिसायला हलकी वाटत असली, तरी तिचे अतिसेवन लिव्हर (यकृत), मेंदू आणि हृदयावर नकारात्मक परिणाम करू शकते. जर एखादी व्यक्ती अधूनमधून आणि मर्यादित प्रमाणात याचे सेवन करत असेल, तर मोठा धोका नसतो. मात्र, ‘हेल्दी’ समजून रोज राईस बिअर पिणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. यामध्ये असलेल्या कॅलरीजमुळे वजन वाढण्याची भीती असते आणि अल्कोहोलमुळे व्यसन लागण्याचा धोकाही कायम असतो.
Gen-Z मध्ये ट्रेंड वाढण्याचे कारण
आजची पिढी कोणत्याही गोष्टीला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवताना त्यात ‘रिलॅक्सेशन’ शोधते. राईस बिअरला सोशल कनेक्शन वाढवण्याचे आणि मूड फ्रेश करण्याचे साधन मानले जात आहे. ‘क्राफ्ट बिअर’ आणि ‘लाईट बिअर’च्या नावाखाली तरुणाईला हे पर्याय अधिक सुरक्षित वाटतात, पण तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोल कोणत्याही स्वरूपात असले तरी ते मर्यादित असणेच हिताचे आहे.
