मुंबई: राज्यसेवा मुख्य परीक्षा ही सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक स्वरुपात सन २०२३ पासून लागू करण्याबाबतचा निर्णय आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आला होता.
परंतु ही परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून घेण्याची उमेदवारांची मागणी व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती तसेच तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा अशी उमेदवारांनी केलेली मागणी, या बाबी विचारात घेऊन फेरविचारांती सुधारित परीक्षा योजना व नवीन अभ्यासक्रम वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेपासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे, असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 23, 2023
लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे.
‘या आंदोलनावर या उमेदवारांशी आम्ही संवाद साधला होता. त्यांच्याशी वारंवार बोलत होतो. उपमुख्यमंत्र्यानीही या तरुणांशी चर्चा केली होती. मंत्रीमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा करून शासन या उमेदवारांच्या भावनांशी सहमत असल्याचे आयोगाला कळवण्यात आले होते. उमेदवारांच्या भावना आणि हित लक्षात घेऊन आपण आयोगाकडे या नव्या परीक्षा पद्धतीसाठी आणखी वेळ देण्याची विनंती केली होती. आयोगानेही या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल आयोगाला धन्यवाद देतो.’ असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.