
दिल्लीला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. आता त्या बुधवारी दुपारी १२:३० वाजता रामलीला मैदानावर एका भव्य समारंभात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळाचाही शपथविधी होईल.भाजप हायकमांडने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी वरिष्ठ नेते ओ.पी. धनकर आणि रविशंकर प्रसाद यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.
निकालानंतर ११ दिवसांनी मुख्यमंत्र्यांची घोषणा
भाजपने २६ वर्षांनंतर दिल्लीत मोठा विजय मिळवला आहे. ८ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपला ७० पैकी ४८ जागा मिळाल्या. निकालानंतर ११ दिवसांनी मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. विरोधी पक्ष आम आदमी पक्ष (आप) या विलंबाबद्दल सतत प्रश्न उपस्थित करत होता.