डेहराडून/पाटणा: राजकारणात महिला सक्षमीकरणाच्या बाता मारल्या जात असतानाच, उत्तराखंडमधील एका कॅबिनेट मंत्र्याच्या पतींनी महिलांबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. उत्तराखंडच्या महिला सक्षमीकरण आणि बालविकास मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी लाल साहू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये साहू बिहारमधील मुलींची ‘बोली’ लावत असल्याचा आरोप होत असून, यामुळे बिहार आणि उत्तराखंडमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
सोमेश्वर विधानसभा क्षेत्रातील दौलाघट येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना गिरधारी लाल साहू यांनी उपस्थितांशी संवाद साधताना विवाहाच्या विषयावर टिप्पणी केली. “तुम्ही म्हातारपणात लग्न करणार का? आमची ३-४ मुले तर होऊनही गेली. मी बिहारमधून मुलगी आणून देईन, तिथे २०-२५ हजार रुपयांत मुलगी मिळते. तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुमचे लग्न लावून देतो,” असे विधान साहू यांनी केले. एका जबाबदार मंत्र्याच्या पतीने जाहीर व्यासपीठावरून महिलांचा असा अपमान केल्याने सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीका होत आहे.
‘विनोद’ म्हणत मागितली माफी
या विधानावरून उत्तराखंडमध्ये काँग्रेसने आणि बिहारमध्ये आरजेडीने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर गिरधारी लाल साहू यांनी सोशल मीडियावर एक स्पष्टीकरण दिले आहे. “मी माझ्या एका मित्राच्या लग्नाबाबत केवळ विनोदाने (हास्यप्रद) बोललो होतो. माझ्या विरोधकांनी आणि काँग्रेसने या विधानाचा विपर्यास करून ते चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडले आहे. तरीही माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी हात जोडून माफी मागतो,” असे त्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
बिहारमध्ये ‘आरजेडी’ आणि महिला आयोगाचा संताप
या विधानावर बिहारमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी याला ‘बिहारच्या लेकींचा अपमान’ म्हटले आहे. “बिहार ही माता सीतेची भूमी आहे. पंतप्रधान ‘बेटी बचाओ’चा नारा देतात आणि त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांचे पती महिलांची बोली लावतात, हे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आणि पंतप्रधानांनी यावर माफी मागावी,” अशी मागणी त्यांनी केली.
दुसरीकडे, बिहार महिला आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा यांनी साहू यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. “हे विधान त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. आज बिहारच्या महिला प्रगतीच्या शिखरावर असताना अशा प्रकारची वक्तव्ये अक्षम्य आहेत. महिला आयोग या प्रकरणाची दखल घेत असून त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या वादामुळे आता भाजप आणि उत्तराखंड सरकारची अडचण वाढली आहे.
