गोरेगाव झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन त्याच जागेत ; विकासकासोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. ०७ : गोरेगाव येथील भगतसिंगनगर येथे मुंबई सागरी किनारा प्रकल्पातील उड्डाणपुलामुळे तेथील झोपडीधारक रहिवाशांचे त्याच ठिकाणी किंवा जवळपासच्या परिसरात पुनर्वसन करण्याची मागणी आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) पुनर्वसन प्रकल्पासाठी खासगी विकासकाची निवड करण्यात आली होती. हा प्रकल्प विकासक पूर्ण करू शकला नसल्याने येथील झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन रखडलेले आहे. हे पुनर्वसन पुन्हा त्याच जागेत करण्यासाठी विकासकासोबत चर्चा करून यावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
याबाबत सदस्य विद्या ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी चर्चेमध्ये सदस्य योगेश सागर, सना मलिक यांनी सहभाग घेतला.
मंत्री सामंत म्हणाले, या पुलाच्या मार्गरेषेत पाया व पोहोच रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या खासगी जागेवरील ५४० झोपडीधारकांचे पूनर्वसन करण्याकरित्ता व पर्यायी जागेकरिता घरे उपलब्ध करुन देण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करण्यात येत असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात आलेल्या वर्सोवा-दहीसर-भाईंदर या किनारी रस्त्याचा पुल हा महत्वाचा भाग आहे. याकरिता बाधित होणाऱ्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न करता त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात पूर्ण काळजी घेऊन हा प्रकल्प पूर्ण करण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.