Petrol Diesel Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! राज्य सरकारकडून पेट्रोल, डिझेल दरात कपात

WhatsApp Group

Petrol Diesel Price : राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 6000 कोटींचा बोझा पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली.


शिंदे-फडणवीस सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील जनतेला आणि मालवाहतूकदारांनाही दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलवरील करात दोन वेळा कपात केली होती. मात्र राज्यात सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट घटवला नव्हता. दरम्यान, राज्यात सत्तापरिवर्तन होऊन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर विधानसभेमध्ये विश्वासमत जिंकल्यानंतर सभागृहाला संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करणार असं म्हटलं होतं. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.